Saturday, May 11, 2024

आई



 

जगातल्या जवळ-जवळ प्रत्येक भाषेत आईसाठी जे शब्द आहेत, त्यातचा उच्चार असतोच.  मदर, मा, माद्रे, अम्मा, ममी इत्यादी. आपण मात्र आई म्हणतो. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे आई, असे कोणीतरी मागे सांगितले. खरे खोटे कोणास ठाऊक, पण आई बरोबर असलेली नाळ काही तुटत नाही. मार्च महिन्यात आई असाध्य कर्करोगाशी तीन वर्षे झुंज देत गेली.२९ मार्च २०२१ रोजी तिच्या कर्करोगाचे निदान झाले. रोग फारच पुढच्या टप्प्यात पोचलेला, त्यामुळे पोटात पाणी भरलेले. तिचे वय, तिची अंगकाठी आणि पसरलेला रोग, त्यामुळे शस्त्रक्रिया शक्य नव्हती. डॉक्टरांनी तेंव्हाच सहा महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य यांच्याकडे नाही, असा निवाडा दिला. पण आईने त्या रोगाला वाकुल्या दाखवत, डॉक्टरांचा निवाडा खोटा ठरवत तीन वर्षे रोगाला झुंज देत, बरोबर २९ मार्च २०२४ रोजी अखेरचा श्वास घेतला.

 

या तीन वर्षांत ती पलंगाला खिळून आहे असे फक्त सुरुवातीचे तीन महिने आणि हे शेवटचे दोन महिने, एरवी उरलेले अडीच वर्षे ती व्यवस्थित राहिली. दरवेळेस केमोथेरपी देतांना नर्सेस विचारायच्या, “आजींना काही त्रास? बी.पी. शुगर, किंवा आणखीन काही? कधी कुठले ऑपरेशन झालेय?” सगळ्याचे उत्तर नकारात्मक! कारण आईला कोणताच त्रास नव्हता. आईची जिद्द, तिची इच्छाशक्ती आणि रोगाला मात देऊ शकू या विश्वासाने तिने तीन वर्षे काढली. कधीही तिला विचारलं, ‘कशी आहेस?’ ‘व्यवस्थित आहे मी. काही होत नाहीये मला.’ हे तिचे पेटंट उत्तर! शेवटी मात्र रोगाने तिला संपूर्ण ग्रासले, वैद्यकीय शास्त्राने आधीच हात टेकले होते, आता तिच्या शरीराने देखील हात टेकले आणि मग इच्छाशक्ती देखील संपली. मृत्यू असतोच, पण आईने ही लढाई जिंकली असे म्हणायला काहीच हरकत नाही. हा लढाऊ बाणा मात्र सुरुवातीपासूनच असावा.

 

त्याकाळी लहान असलेल्या अमरावती शहरातून लग्न होऊन आई मुंबईला आली आणि मुंबईचीच झाली. कधी कधी तिचे अनुभव सांगायची; तिची पहिली पाणीपुरी, पहिल्यांदा खाल्लेला डोसा, पहिल्यांदाच पाहिलेला समुद्र. एका मोठ्या कुटुंबातून लग्न होऊन ती मुंबईच्या चाळीत रहायला आली, तेंव्हा तिला किती adjustments करायला लागल्या असतील कोणास ठाऊक? माहेर लोकांनी आणि धार्मिक संस्कारांनी आणि कर्म-कांडांनी भरलेलं, आणि इथे दोघेच दोघे, त्यात डॅडींची देव-धर्माच्या बाबतीत अनास्था! पण स्वतःहून अनेक नवीन गोष्टी शिकत, मैत्री करत आणि लोकांना आपलेसे करत, तिने फार मोठा गोतावळा जमा करून ठेवला. अरुणा-मावशी-आई-काकी-आणि शेवटी आजी, या प्रवासात तिने खूप माणसे जोडली. अगदी केमोथेरपीच्या हॉस्पिटल मधल्या नर्सेस आणि डॉक्टरांशी पण ऐसपैस गप्पा मारायची. दरवेळेस नर्सेसना, ‘पुढच्या वेळेस तुमच्या साठी काय आणू?” असे विचारायची आणि त्या देखील हक्काने लाडू, चिवडा अश्या फर्माईशी करायच्या.पुढच्या वेळेला संपूर्ण स्टाफ साठी स्वतः केलेले लाडू घेऊन आई हजर!

 

आईला स्वयंपाक करण्याची आणि लोकांना खाऊ घालण्याची भयंकर हौस. सुगरण तर होतीच आणि हाताला चव. तिने केलेल्या साध्या भाज्यांची देखील लोक तारीफ करत. त्याचबरोबर नवीन पदार्थ शिकण्याची देखील हौस. अमेरिकेवरून जेंव्हा ती परतली, तेंव्हा पिझ्झाची रेसिपी लिहून आणली होती आणि इथे करून खाऊ घातला होता. ओवन वगैरे नव्हता, पण तिचे स्वतःचे लॉजिक आणि डोके वापरून तिने तव्यावरचा पिझ्झा खाऊ घातला होता! नातवडांना एकदा टीव्ही वरचे पाहून बार्बेक्यू खायचे होते, तेंव्हा हिने लोकरीच्या सुयांना भाज्या लावून, गॅस वरच शेकून त्यांना तृप्त केले. कोणत्याही कारणासाठी अडून रहायचे नाही, हार मानायची नाही, ही जिद्द, जी शेवटपर्यंत होती.  डॅडींचे, आमचे, आमच्या मुलांचे मित्र मैत्रिणी, तिच्या मैत्रिणी, तिचे विद्यार्थी, सगळ्यांच्या जिभेवर आजही तिच्या पदार्थांची चव रेंगाळतेय. एवढी सगळ्यांना हौसेने खाऊ घालणारी आई, शेवटच्या पंधरा दिवसांत मात्र अन्नाचा एक कणही खाऊ शकली नाही.

 




प्रत्येकाला आपलंसं करून घेण्यात तिची हातोटी, मग तिच्याहून वयाने, शिक्षणाने मोठी माणसे असोत किंवा तिची नातवंडे आणि त्यांचा मित्र परिवार असो, तिची सगळ्यांशी मैत्री. प्रत्येकाला तिचा आधार. मोठ्यांबरोबर त्यांच्या विषयावर गप्पा मारणे, लहान मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, खेळणे, हे तिला खूप आवडत असे.महागडी खेळणी काय करायचीत लहान मुलांना?” असे म्हणून घरातलीच भांडी त्यांना खेळायला द्यायची. मुलेही आनंदात खेळायची.

 

डॅडींच्या नावाचे वलय मोठे, त्यांचे मित्र पण त्याच तोडीचे, पण आईवर कधीच या गोष्टीचे दडपण नव्हते. सगळ्यांशी गप्पा मारत त्यांना विविध पदार्थ खाऊ घालत ती त्यांच्याशी मैत्रीचे नाते तयार करत असे. डॅडींचा देव, कर्म-कांड वगैरे वर अजिबात विश्वास नव्हता, आणि आईची मात्र रोज पूजा, पोथी नियमित सुरु असायचे. डॅडींनी कधी तिला विरोध केला नाही, किंवा तिनेही कधी डॅडींना भरीस घातले नाही. या दोघांचे अनेक विचार न जुळणारे असून देखील जवळ-जवळ ५० वर्षे त्यांनी संसार केला. हल्लीच्या युगात ज्याला तरुण मंडळीआमची स्पेस हवीअसे म्हणतात ना, तीस्पेसया दोघांनी एकमेकांना न मागता किंवा त्याचे अवडंबर न माजवता दिली होती. भांडणे, वाद होत नसत असे अजिबात नाही! आई स्वतःचे मत, तिचे विचार सांगायला, खरे तर ठासून सांगायला ती अजिबात कमी करत नसे.

 

डॅडी तिच्याबरोबर न कंटाळता तिच्या मराठी मालिका पहात असत आणि आई देखील, जर डॅडींनी एखादा लेख, पुस्तक किंवा एखादी बातमी वाचायला सांगितली तर आई हमखास वाचून काढत असे आणि आवडले नाही तर ते देखील सांगत असे. तिची स्वतःची अशी राजकीय मते होती आणि त्याबद्दल डॅडींशी वाद घालायला देखील ती कमी करत नसे. डॅडींची नोकरी, फिरती, येण्याजाण्याच्या विचित्र वेळा, त्यांचा अबोल स्वभाव सगळेच तिच्या अंगवळणी पडले होते आणि त्याविषयी तिची कधीच तक्रार नसे. आमची आत्त्या घरी आली, की हीच कधीतरी म्हणायची, ‘अहो दोघे बहिण भाऊ गप्पा मारा की जरा, काय त्या पुस्तकांत नाक खुपसून बसला आहात!तिचे मात्र सगळ्यांशी गुळपीठ. इथून कधी फोन केला आणि खूप वेळ जर एंगेज लागला, तर समजायचे की आई कोणत्यातरी काकू, आत्त्या, मावशी मामी, किंवा एखाद्या मैत्रिणीशी बोलतेय!

 

कोणाला एखाद्या पदार्थाची रेसिपी सांग, एखाद्याला आयुर्वेदिक औषधच सांग असे तिचे कायम सुरु असे. लोकांना मदत करण्यात तिला अतीव आनंद होत असे. कोणी आजारी असले तर हमखास धावून जायची आई. माझे लग्न तेंव्हा नुकतेच ठरले होते आणि मझ्या सासूचे पायाचे ऑपरेशन झाले. आई त्यांच्या मदतीला मुंबईहून उठून कलकत्त्याला गेली होती. धड ओळख न पाळख. माझे सासर संपूर्ण मांसाहारी, ती पक्की शाकाहारी, तरी गेली आणि १५-२० दिवस तिथे राहून त्यांची सेवा करून आली. मावशीचे यजमान अपघातात अचानक गेले, तेंव्हा वर्षभर बहिणीला एकटे वाटू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी ती औरंगाबादला जाऊन तिच्या बरोबर रहात असे. घरी काम करणाऱ्या बायका, कॉलनीचे वॉचमन किंवा माळी सगळ्यांना कोणत्याना कोणत्या तरी पद्धतीने तिने आपणहून मदत केली आहे. हे तिला कोणी सांगत नसे, तिची ती वृत्तीच होती आणि डॅडींचा तिला पूर्ण पाठींबा असे. लग्न लवकर झाले, म्हणून शिक्षण अधर्वट राहिले होते. ते लग्नानंतर पूर्ण तर केलेच, पण त्या नंतरही स्वस्थ नाही बसली. ती शास्त्रीय गायन शिकली. कुठे टेक्स्टाईल डिझायनिंगचा कोर्स कर, तर कुठे लायब्ररी सायन्सचा कोर्स तर कधी हस्तकला आणि शेवटी योगाभ्यासाचा कोर्स. स्वस्थ कधीच बसली नाही ती. समाज कार्याच्या आवडीने स्त्री-मुक्ती संघटनेत पुष्कळ वर्षे कार्यरत होती. संधी मिळाली असती तर कदाचित इंजिनियर डॉक्टर झाली असती ती! आम्ही लहान असतांना काहीही बिघडले की ही त्याला दुरुस्त करायला तयार. एकदा घरातला ट्रांझिस्टर बिघडला. ही बसली तो दुरुस्त करायला.झाला तर झाला नाही तर दुकानात देऊ,” पण त्याची गरजच पडली नाही आणि तो पुशे ३-४ वर्ष तरी मस्त चालला!! हाताला चव आणि हातात कला. तिने काढलेली रांगोळी पुसाविशीच वाटत नसे. या, आणि अश्या अनेक गोष्टी तिच्याकडून शिकायच्या राहूनच गेल्या. आई आहेच आणि ती असणारच हा जो विचार असतो, तो किती फोल ठरतो हे २९ मार्चला कळले.

 

नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या असून सुद्धा आईने नोकरी का नाही केली हे एक कोडेच आहे. पण आम्हां दोघी बहिणींना शेजारच्या तरुण मुलींना ती नेहमीच त्यासाठी प्रोत्साहन देत आली. माझा भाचा तर आजी जवळच मोठा झाला. मला देखील, कधी कामानिमित्त कुठे जायचे असल्यास, आई माझ्या लेकीला सांभाळायला माझ्या घरी हजर. शेजार-पाजारच्या तरुण मुली नोकरीवर जात, त्यांची मुले आमच्याकडेच रहात.तू जा, मी सांभाळते मुलांना, त्यांची काळजी नको करूस”, असे त्या मुलींना ती सांगे. त्यांना सांभाळणे, म्हणजे ती त्यांना लळाच लावत असे. तिला ना कधी दागिन्यांची हौस होती न कधी नवीन साड्यांची. स्वतःसाठी तर नक्कीच नाही. मात्र काहीतरी नवीन शिकण्याची मात्र हौस मात्र कमी झाली नाही,

 

अगदी शेवटपर्यंत तिने योगाभ्यासाचे वर्ग घेतले. शिकायला खूप विद्यार्थी होते, मुले मुली, मध्यमवयीन, म्हातारे आणि विवध थरातले लोक. आधीतर फी घ्यायची नाही असेच तिने ठरवले होते, पण आम्ही भरीस पाडले म्हणून १०० रुपयांच्या फी पासून सुरु करून स्वाती ५०० रुपये महिना, अशी फी ती घेत असे. केमोथेरपी घेऊन आली की त्यादिवासाचा क्लास बंद, मग २-३ दिवसांनी परत सुरु. बरे नसतांना देखील तिने स्वतःचे असे रुटीन तयार करून ठेवले होते. आई फेसबुक आणि whatsapp वर बरीच active होती. कोणाचा फोटो किंवा चांगले काही लिहून आले की लगेच हिची कमेंट असे. बरीचटेक सॅवीहोती. रोज वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवणे हा तिचा छंद. एकदा तिच्या मैत्रिणीने, गांगल मावशीने विचारले, शब्द अडला की काय करतेस गं? आई म्हणाली मी गुगल करते!! आता राहून राहून असे वाटते, की तिच्या विचारांची संगतीच लागत नाही. देवा-धर्माचे पालन करणारी, पोथी पुराणाचे पठण करणारी, शेगावला दर महिन्याला जाऊन दर्शन घेणारी, पंढरपूरची वारी करणारी आई, जायच्या आगोदर निक्षून सांगून गेली, माझे दहन करा, पण अस्थी विसर्जन, श्राद्ध वगैरे काही घालायचे नाही. माझ्या मुलीला देखील, लग्न वगैरे सगळं नंतर, आगोदर PhD करून शिक्षण पूर्ण कर, असा सल्ला द्यायची! 

 

आई गेली की माहेर संपते. लग्न झाल्या नंतर आईकडे, माहेरी गेले, की कसे अश्वसात्मक वाटत असे. काही चिंता नाही, काळजी नाही … आई आहेच हा विश्वास. बहिणाबाईंनी किती छान सांगितले आहे, “ माझ माहेर माहेर, सदा गाणे तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासरले कशासाठी?” त्याला सासुरवाशीण उत्तर देते:अरे लागले डोहाये, सांगे शेतातली माटी, गाते माहेराच गाणं, लेक येईल रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते! देव कुठे देव कुठे, भरीसनी जो उरला,अरे उरीसुनी माझ्या, माहेरात सामावला!असं माहेर, आता घर आहे, पण आई नाही त्यामुळे माहेर नाही. घरी दहा बारा लोक जेवायला आले, की आईलाच विचारायचे, ‘आई भातासाठी किती तांदूळ घेऊ, किंवा किती भाजी लागेल?’ किंवा अनेकदा करूनही पुरणपोळी करायच्या आधी, आईला विचारलच पाहिजे, काय किती घेऊ, त्याचे प्रमाण काय? आई गेली आणि  हे माहेरपण पण संपले. एकदम मोठे झाल्यासारखे वाटू लागते. आईशी अनेक बातीत पटायचे नाही, वादही व्हयचे पण परत काही अडले, काही आनंदाची बातमी असली, की आधी तिलाच सांगायचे असायचे. 

 

अशी आमची आई. जिद्दी आणि थोडोशी हट्टी देखील, पण माया लावणारी. माणसे जोडणारी, सगळ्यांना मोठेपणाच्या पंखाखाली घेणारी, प्रत्येक कार्य निर्वेध पार पाडणारी, साधी गृहिणी, अनेकांचा आधारस्तंभ, अरुणा साधू. तिच्या आठवणींना हा उजाळा. 



  

 

No comments:

Post a Comment