Thursday, May 26, 2022

समाधान

 

 

हसण्याचं वय नसतं

लहान मोठी गुपिते ऐकून

खिदळण्याचंही वय नसतं

 

शिकण्याचं वय नसतं

चुकत-माकत पडत-उठत

पुढे जाण्याचंही वय नसतं

 

शिकण्याचं खरच वय नसतं

आजी-आई, मित्र -भाऊ

अगदी नातवंडांकडूनही ते घडत असतं.

 

फिरण्याचं वय नसतं

सौंदर्याचा आस्वाद घेत 

बागडण्याचं वय नसतं

 

नटण्याचं वय नसतं

जुने-नवीन “ट्रेंड्स फॉलो” करीत

मुरडण्याचंही वय नसतं.

 

बोलण्याचं वय नसतं

खरं-खोटं बोचरं-लाघवी

मनातलं सांगायचं वय नसतं

 

मैत्रीचं वय नसतं

कधी कुठे कसे धागे जुळतील

त्या स्नेहाचं वय नसतं

 

गमतीचं वय नसतं

मित्र-सोबती, गप्पागोष्टी

धम्माल करण्याचं वय नसतं

 

गाण्याचंही वय नसतं

धुंद-मंद संगीतात

न्हाऊन निघायचं वय नसतं.

 

स्वातंत्र्याचं वय नसतं

चिंता, मत्सर लोभ क्रोध

यातून मुक्त होण्याचं वय नसतं

 

घाबरण्याचं वय नसतं

प्रेम, जीवन, आजार मृत्यू

याचं भय असून नसतं

 

आनंदाचं वय नसतं

प्रत्येक क्षणांत लपलेल्या त्या

आमोदाच वय नसतं

 

तृप्ततेचं वय नसतं

वादळात सापडलेल्या होडीला

अलगद तीरावर पोचवण्यात समाधान असत.

 

No comments:

Post a Comment