Wednesday, January 13, 2021

आठवणीचे साम्राज्य!


मकर संक्रांत 

"तीळ - गुळ घ्या आणि गोड गोड बोला," मकर संक्रांत म्हंटल की मराठी माणूस हमखास हे वाक्य म्हणतो. लहान मोठ्यांना नमस्कार करतात आणि मोठे आशीर्वादापर तीळ-गुळ हातात ठेवतात. 

आज मकर संक्रांत. एरवी तारखा बदलणारे आपले सण, मकर संक्ररांत मात्र तारीख बदलत नाही. दरवर्षी जानेवारीच्या १४ तारखेला येणारा हा सण, वेगळीच गंमत करून जायचा. 

लहान असतांना, एव्हाना थंडीचा जोर कमी होत चाललेला असायचा आणि उन्हाचा ताप वाढत जायचा. अर्थात , मुंबईची थंडी म्हणजे फक्त पहाटे थोडीशी आणि रात्री थोडीशी. पण त्याच्यात सुद्धा आम्ही कधी कधी स्वेटर घालून शाळेला जायचो, रात्री दुलई किंवा blanket घेऊन झोपायचो... पंखा मात्र फिरत राहिला पाहिजे!

तर अश्या थंडीत येणारी ही मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे नक्की काय, ह्याची फारशी माहिती नव्हतीच. आमच्या साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईने केलेल्या तीळ-गुळाच्या पोळ्या, लाडू, हळदी कुंकू आणि तिळगुळ देता-घेतांना म्हंटलेलं, "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,". आमच्आया घरी संपूर्ईण तिळाचे लाडू क्वचितच व्हायचे. आई नेहमीच तीळ कुटाचे लाडू करायची. मग आम्ही आईच्या मागे लागायचो, पूर्ण तीळाचे लाडू हवेत म्हणून. मग ते तसे एक ७-८ लाडू, विकत आणायचे.

संक्रांतीच्या आधी काही दिवस आई आणि तिच्या मैत्रिणींचे संवाद कानी पडत, " या वर्षी काय लुटणार?" किंवा "यावर्षी काय वाण देणार गं?" असे प्रश्न! आई बरोबर वेग-वेगळ्या घरी हळदी कुंकवाला जाणे आणि ती सुगडी गोळा करणे, मला फार आवडत असे. त्या सुगाड्यांमध्ये थंडीचा मेवा असायचा. बोरं, गाजराचे तुकडे, उसाची लहान कांडे, हरभरा आणि अर्थातच तीळगुळ. काही बायका अति उत्साही, त्या तीळाचा हलवा करायच्या, वेगवेगळे रंग टाकून! हल्ली हा हलवा कोणी घरी करत असेल असं वाटत नाही. कोणी रुमाल वाटायच्या, कोणी चमचे, तर कोणी साबण अश्या अनेक वस्तू. त्यात एक मजा असायची.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतलं हळदी कुंकू. प्रत्येक वर्ग एक तारीख ठरवायचा. चार आणे - आठ आणे, अशी वर्गणी गोळा व्हायची. मग प्रत्येक शिक्षिकेला आमंत्रण दिलं जायचं. त्याच्या साठी हळद कुंकू, शेवंतीची फुले आणि तीळगुळ हे आणून ठेवायचं. पूर्ण वर्ग त्या दिवशी स्वच्छं करायचा आणि फळ्यावर स्वागतपर काहीतरी लिहिलेलं असायचं. सगळ्या शिक्षिका येऊन गेल्या कि मग आम्ही उरलेल्या तीळगुळावर ताव मारायला मोकळे! त्यात भांडणेही व्हायची, वर्गणी कशी संपली इथ पासून ते तीळगुळ आम्हाल नाही मिळालं इथ पर्यंत. पण त्यात एक मजा असायची! "गोड गोड बोला" कुठल्या कुठे विरून जायचं!

संक्रांतीच्या आधीपासूनच बाजारात पतंगांची विक्री सुरु असायची. आजच्या दिवशी पतंग उडवायची, आणि पेच पण लढवायचे. कोणी किती पतंग गोळा केल्या ह्याची पण चढा-ओढ असायची. दुसरी मजेदार गोष्ट म्हणजे हलव्याचे दागिने. महाराष्ट्र सोडून दुसरीकडे कुठेही असं सोहळा मी पाहिलेला नाही. असेलही कदाचित, वेगळ्या पद्धतीने. महाराष्ट्रात मात्र नवीन लग्न झालेल्या मुलींना आणि काही ठिकाणी मुलांना पण, काळे कपडे घालतात. सुंदर काळ्या रंगांच्या साड्यांची मागणी असते ह्या दिवसांत. हलव्याचे दागिने म्हणजे, अगदी डोक्याच्या बिंदी पासून ते कंबर पट्टा, बांगड्या मंगळसूत्र ते अगदी जोडवी सुद्धा असतात! जसं नव्या जोडप्याचे कौतुक होतं, तसाच वर्षाच्या आतल्या मुलांचे पण होतं. त्याला बोर न्हाण म्हणतात. लहान लहान मुलांना काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालुन्घाळून त्यांच्या डोक्यावरून हिवाळी मेवा ओतला जातो, आणि जमलेल्या लहान मुलांनी तो गोळा करायचा! 

अश्या अनेक छोट्या मोठ्या आठवणी संक्रांत घेऊन आली! आदल्या दिवशीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीची मजा औरच असे!

थोडी मोठी झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली, हाच एक सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. दसरा दिवाळी होळी ह्यांच्या तारखा कधीच एक नसतात, असं का? हाच सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो. गुजरात मध्ये उत्तरायण, पंजाब मध्ये लोहडी, तामिळनाडू मध्ये पोंगल आणि आसाम मध्ये बीहू, असा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो.

तर गम्मत अशी आहे कि हा आहे सूर्याचा सण. म्हणजे मकरसंक्रांतीला सूर्य देवाचं महत्व आहे. आपले बाकी सगळे सण हे चंद्र पंचांग, अर्थात चंद्राच्या कलांवर अवलंबून असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य मकर राशी प्रवेश करतो. सहा महिने दक्षिणायानात परिक्रमा करत असलेला सूर्य आता उत्तरायणात शिरतो. दिवस हळू हळू मोठे व्हायला लागतात आणि रात्री लहान. हा दिवस सूर्याचा, म्हणजेच सुर्य पंचांगाचा. आणि म्हणूनच हा सण तारखेप्रमाणे साजरा होतो. मात्र माझे आजोबा सांगायचे, त्यांच्या लहानपणी मकर संक्रांत १३ जानेवारीला होत असे. त्याचं कारण, सौर पंचांगानुसार, परिक्रमा करत असतांना, सूर्य ठराविक ठिकाणी दरवर्षी २० मिनिटे उशिरा पोचतो. म्हणजेच प्रत्येक ७२ वर्षानंतर सूर्याचा उत्तरायणात शिरण्याचा दिवस एका दिवसाने वाढतो.

असं हा सूर्याचा खेळ! आपल्या पूर्वजांनी देखील किती संशोधन करून हे ठरवलं असेल नाही? ह्या विज्ञानातल्या, भौतिक शास्त्राच्या खेळला त्यांनी धर्माची, देवांची जोड लावली आणि हा दिवस आपण विसरू नये ह्याची खात्री करून ठेवली! थंडीत शरीरात calories जास्त जायला हव्यात म्हणून गुळ आणि तीळ खाणे आवश्यक करून ठेवलं, हुशार होते आपले पूर्वज!

Gregorian Calendar , म्हणजे हल्ली आपण जे पाळतो, त्याच्यातला हा पहिला महिना आणि हा आपला पहिला सण, खूप काही आठवणी घेऊन आला. अनेक जुने शब्दही त्या निमित्ताने आठवले, सुगडी, उसाची कांड, वाण... बहुदा ही शब्द संपत्ती टिकवण्यासाठीच कदाचित म्हणत असतील, "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!"