Thursday, August 6, 2020

साठा उत्तराची कहाणी

 

अरे काय करतो आहेस नुसता बसून,

मन नाही भरलं कारे अजूनही

स्वतःचं कौतुक बघून?

 

नाही गं, पाहतोय तिला,

पाण्यातून वाट काढणारी बाई

डोक्यावरच्या टोपलीतल्या मुलाला सांभाळत नेणारी आई

 

तिथे पावसात अडकली आहे ती Ambulance

आतला रुग्ण आणि डॉक्टर दोघेही हवालदिल,

पण करणार काय? गाडीला पुढे सरकायला मिळतच नाहीये हिरवा कंदील

 

त्या तिथे झालाय बॉम्बस्फोट

लोकांचा जीव घेण्यासाठी?

तूच सांग, कोणाला मारून कधी मिळते का मुक्ती?

 

विषाणूच्या संसर्गाने लोक झालेत त्राही त्राही

अन्न वस्त्र निवारा

कित्येकांकडे काहीच नाही

 

तरी ह्यांच्या इच्छा संपत नाहीत

जे आहे तेवढ्यात

सुख अजिबात मानत नाहीत.


एवढ्या धुमाळीत करतात

लहान मुलींवर बलात्कार, बायकोला मारतात जाळतात

कसा धजावतो गं ह्यांचा हात?

 

नद्या म्हणे जीवन दायी, पण मग ठेवत का नाहीत साफ सफाई?

नाला करून टाकलाय सगळ्या नद्यांना

मग ती गोदावरी शरयू असो कि गंगा यमुना

 

अरे असा किती त्रागा करशील?

तू सुद्धा होतासच कि माणूस,

जश्या तू चुका केल्यास, तश्याच त्यांच्याही हातून घडतील

 

थोडा वेळ बाहेर फिरून ये,

मोकळ्या हवेत बर वाटेल,

तुमच्या गप्पांचा अड्डा नाही का आज? थोडी मनः शांती मिळेल

 

भेटलो होतो कि परवाच सगळे,

आले होते अल्ला आणि god देखील.

सगळ्यांनीच उडवली टर माझी, म्हणे लवकरच मह्गड्या घरात रहायला जाशील

 

अल्ला ही होता वैतागलेला,

God ने तर हातच टेकले,

काय होतंय नाकातोंडला फडका बांधायला, ह्यांना कोण जाणार समजवायला, म्हणाले

 

कशाला करताय वारी,

कशाला जाता मक्का मदिना आणि रोमला?

भिनलोत आम्ही तुमच्या प्रत्येक कणाकणात, कितींदा पाहिजे म्हणे सांगायला?

 

पूर्ण पृथ्वी वर

केवळ ह्यांच्या कडेच आहे विचार करण्याची शक्ती,

पण त्यांतून त्यांनी जन्माला घातलीये नको असलेली ही आंधळी भक्ती

 

निसर्गाच्या बरोबरीने रहा

हाच निर्णय खरा

पण ह्यांना निसर्ग देखील पाहिजे मुठीत, म्हणे ही आमचीच धरा

 

म्हातारीच्या खुलभर दुधाने

भरला राजाच्या शिवालयाचा गाभारा,

ही कहाणी सांगून सांगून, मीच झालोय म्हातारा.

 

माझ्याही हातून चुका घडल्या,

आहे मला कबूल,

पण माझी हीच गोष्ट माणसात उतरावी, ही खरी दिशाभूल

 

कसा राहू मी त्या घरात

जेंव्हा विस्कटलय माझ्या लेकरांच जीवन

अन्न नाही, शाळा नाहीत, उपचारांसाठी इस्पितळ नाही, कसा करू हे सहन?

 

ह्या गोष्टीने का झालंय

विचलित तुझं चित्त?

असं समाज, तुझ्या चुकांचं हेच आहे प्रायश्चित्त

 

नको गं सीते असा श्राप देऊस

मग घे अवतार धरतीवर पुन्हा पुन्हा

आणि शिकवं त्यांना खऱ्या गोष्टी, रामा रघुनंदना

 

मी तर जाईन गं वेळोवेळी

पण भीती वाटतेय फार

स्वीकारतील का हे लोक माझा हा २.० अवतार?

 

त्यांचे विचार बदललेत

त्यांच्या गरजा बदलल्या.

अरे पण तो शेवटी माणूसच आहे, आपलीच लेकरं हे तू कसे विसरलास.

 

मी ही येते, जाऊया परत एकदा

देऊया ज्ञानाचे काही धडे

आपल्याला आगोदरच सुचायला हवं होत हे

 

सुरु केली प्रयाणाची तयारी दोघांनी

वनवास संपेल? होती का त्यांच्या इच्छा पूर्ण?

ही साठा उत्तराची कहाणी, नेहमी साठीच अपूर्ण